Konkan Railway| खुशखबर!!दिवा-रत्नागिरी पहिल्या मेमू ट्रेनची उद्या पहिली फेरी!!
- कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या शेकडो फेऱ्या धावणार
- चिपळूणसाठीही स्वतंत्र मेमू धावणार
रत्नागिरी : या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी पहिल्यांदाच दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी पूर्णपणे अनारक्षित असलेली मेमू ट्रेनची पहिली फेरी उद्या दि. १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. दि. २ ऑक्टोबरपर्यंत ही गाडी दररोज धावणार आहे. या गाडीला आधी देण्यात आलेल्या थांब्यांमध्ये रायगडमध्ये सापे वामने, करंजाडी तसेच खेड तालुक्यात अंजनी हे आणखी दोन थांबे वाढवण्यात आले आहेत.
नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्य रेल्वेने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी 156 फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यानुसार 2023 मधील गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. याआधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र येत्या सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमो स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. दिनांक 13 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी धावणार आहे.
मेमू स्पेशल गाडीसह कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने गणेशोत्सवासाठी गणपती विशेष गाड्यांच्या 156 फेऱ्या जाहीर केल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणवासीयांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुरेपूर गाड्या सोडल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार रेल्वेने गणेशोत्सवातील याआधी च्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
यंदा प्रथमच दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी 01153/01154 या क्रमांकासह धावणार आहे. दि. 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत या गाडीच्या 39 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीसाठी सुटेल ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी ती दिवा जंक्शनला पोहोचेल.
दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल गाडीचे थांबे
रोहा, माणगाव, वीर, सापे वामने, करंजाडी खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड. यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरी पर्यंत प्रथमच धावणाऱ्या गणपती स्पेशल मेमू गाडीला एकूण बारा डबे जोडले जाणार आहेत.