आशिष बेलवलकर यांनी साकार केली सुंदर मूर्ती
देवरुख दि. १४ ( प्रतिनिधी ): मातृमंदिर देवरुखच्या प्रसाद बालक मंदिर बालवाडीत पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबतच बालशिक्षणाचे काही वेगळे प्रयोग होत असतात. यातच आपल्या सण – उत्सवांना कला, निसर्ग आणि समाजाचे शिक्षण देणारे माध्यम म्हणून बघितले तर ते अधिक परिणामकारक होतं या विश्वासाने मुलांना निसर्गाशी, मानवतेशी जोडण्याचे अनेक प्रयोग मातृमंदिर तर्फे केला जातो . याचाच भाग म्हणून येणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवरुख येथील प्रसिद्ध मूर्तिकार आशिष बेलवलकर यांनी प्रसाद बालक मंदिरमध्ये येऊन मुलांना प्रत्यक्ष गणपती मूर्ती बनवून दाखवली. चांगल्या मळलेल्या मातीचे गोळे बनवून एक एक हात, पाय, धड, डोकं असा गणपती बनत जाताना पाहण्यात मुलं रंगून गेली.
गणपतीच्या निमित्ताने कलेचा अविष्कार व खऱ्या अर्थाने जीवनशिक्षण याची तोंडओळख देणारा हा अनोखा कार्यक्रम मुलांसाठी अविस्मरणीय आठवणी बनून राहिल.
येत्या गणेश उत्सवात घरातील गणपती बघताना तो कसा बनाला असेल, माती कोणती असेल, रंग कोणते, कसे लावले असतील, असे सगळे प्रश्न मुलांना नक्की पडतील. यानिमित्ताने ऐन गणपतीच्या तोंडावर असलेल्या धामधूमीत देखील प्रसिद्ध मूर्तिकार आशिष बेलवलकर व त्यांचा कलाकार मुलगा अनुप बेलवलकर या दोघांनी येऊन मुलांना हा अनुभव दिला याबद्दल त्यांचे मातृमंदिर संस्थे तर्फे आभार मानण्यात आले .
