चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या चिपळूण येथील संकुलात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी तर लालबहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील, प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता नाईक तसेच शिशुविहार विभागाच्या प्रमुख सौ. रानडे, युनायटेडचे उपमुख्याध्यापक श्री. बनसोडे, पर्यवेक्षक श्री. मुंढेकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर प्रशालेच्या शिक्षिका सौ.लोवलेकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती आपल्या भाषणातून दिली. रोजच्या जीवनात या आदर्श व्यक्तिमत्वांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे असे सांगत गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. गांधीजींना अभिप्रेत असलेला स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी नियमितपणे प्रशालेमध्ये स्वच्छतेचे कामकाज करणाऱ्या कर्मचारी यांचा प्रतिनिधिक स्वरूपात “स्वच्छता दूत” म्हणून सन्मान करण्यात आला.त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
गांधी जयंतीच्या औचित्याने शालेय विद्यार्थ्यांनी त्यांचे कार्य विचार यांचा अभ्यास करावा या हेतूने लिओ क्लब चिपळूणच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी लिओ क्लबचे अध्यक्ष श्री. शाम परांजपे, सेक्रेटरी श्री.सुयश कदम, खजिनदार डॉ.श्री. रजत दाभोळकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू लिओ क्लब मार्फत बक्षीस म्हणून देण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांमधून कैवल्य मुसळे आणि श्रावणी लटके यांनी गांधीजींविषयी तर कनक म्हापुस्कर हिने लाल बहादुर शास्त्री यांच्याविषयी विचार व्यक्त केले. युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ पाटील यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचन करून महान नेत्यांचे विचार समजून घ्या असे आवाहन केले.
यावेळी लिओ क्लबच्या सर्व पदाधिकारी व त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करीत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमा बद्दल त्यांचेप्रती ऋण व्यक्त केले. प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. बनसोडे यांनी कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यानंतर गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी “वैष्णव जन तो” हे गांधीजींचे आवडते भजन सादर केले. सर्व कर्मचारी यांनी श्रमदान करीत शालेय परिसर साफ केला. या स्वच्छता कार्याने कार्यक्रमाची सांगता झाली.














