संगमेश्वर दि. २४ : व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या नजीकच्या जाधववाडी येथील क्षितीज सुरेंद्र पड्ये ( १६ ) या विद्यार्थ्याचे कोल्हापूर येथे उपचार सुरु असताना सोमवारी सायंकाळी अकाली निधन झाले. या दु:खद घटनेमुळे शाळेसह माभळे जाधववाडीवर शोककळा पसरली आहे.
क्षितीज सुरेंद्र पड्ये ( १६ ) हा संगमेश्वर नजीकच्या माभळे जाधववाडी येथे रहाणारा विद्यार्थी व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गणेशोत्सवाच्या सुट्टी पर्यंत तो नियमित शाळेत हजर असायचा. गणेशोत्सवा दरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा दिसून न आल्याने १५ दिवसांपूर्वी क्षितीजला कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याला मेंदू विकार असल्याचे निष्पन्न झाले. यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र, सोमवारी त्याची प्रकृती खालावत गेली आणि सायंकाळनंतर त्याची प्राणज्योत मालवली.

सुरेंद्रचे वडिल घर बांधणीचे काम करतात. त्यांना क्षितीज पेक्षा तीन मोठ्या तीन मुली आहेत. दहावीत शिकणारा मुलगा अचानक गेल्याने पड्ये कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी जाधववाडी येथील स्मशानभूमीत क्षितीजवर अत्यंत दु:खद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले क्षितीजच्या अकाली जाण्याने व्यापारी पैसा फंड संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी संस्था आणि प्रशालेतर्फे श्रध्दांजली वाहून दु:ख व्यक्त केले.















