Konkan Railway | दिवा-रत्नागिरी पॅसेंजर लवकरच धावणार नव्या रंगरूपात !
रत्नागिरी : पूर्वीची दादर-रत्नागिरी आणि सध्याची दिवा रत्नागिरी पॅसेंजर आता लवकरच नव्या रंगरूपात धावताना दिसणार आहे. देखभाल दुरुस्तीसह वेगवर्धन, सेक्शनमध्ये लवकर क्लिअरन्स मिळणे अशाच फीचर्ससह येणारी ही मेमू प्रकारातील गाडी असेल. मात्र, आसन क्षमता घटणार असल्याने कोकणवासीयांसाठी ही गाडी गैरसोयीची असल्याचे दिसत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून धावत असलेली कोकणवासी यांची लाडकी पूर्वीची दादर रत्नागिरी पॅसेंजर (50103/50104) कोरोना काळापासून दिवा- रत्नागिरी पॅसेंजर झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच पूर्वीच्या निळ्या पांढऱ्या रंगसंगतीमधील जुन्या गाडी ऐवजी लाल रंगातील एलएचबी श्रेणीमधील दीनदयाळ प्रकारच्या कोचसह धावत आहे. मात्र, आता ही गाडी आणखी नव्या रंगरूपात धावताना दिसणार आहे.
सध्याच्या एलएचबी गाडी ऐवजी चालवणार मेमू गाडी
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे आता विद्युतीकरण पूर्ण झालेले असल्यामुळे दिवा ते रत्नागिरी मार्गावर सध्या धावत असलेल्या लाल-करड्या रंगसंगतीमधील एल एच बी रेकऐवजी मेमू प्रकारातील गाडी धावताना दिसणार आहे. यासाठी आयसीएफ कपूरथळा येथील कारखान्यात रेक तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. रेल्वे सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर सध्या धावत असलेल्या गाडीला रिप्लेस करण्यासाठी मेमू गाडी मध्य रेल्वेच्या हद्दीत दाखल झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या मेमू गाडीसाठी आवश्यक असलेले सर्व डबे दाखल झाल्यानंतर ही गाडी सध्याच्या गाडी ऐवजी चालवली जाणार आहे.
दुतोंडी मेमू वेळ वाचवणार!
दिवा ते रत्नागिरी या मार्गावर सध्या धावत असलेलली एलएचबी प्रकारातील गाडी ती धावणार असलेल्या दिशेला विद्युत इंजिन जोडून चालवली जात आहे. मात्र मेमू गाडीला दोन्ही बाजूला इंजिन असल्यामुळे सध्या ‘लोको रिवर्सल’साठी लागणारा वेळ वाचणार आहे. याचबरोबर या प्रकारातील रेक पंधरा दिवसातून एकदा तांत्रिक देखभालीसाठी पाठवला तरी चालतो. सध्याच्या गाडीची आठवड्यातून एकदा देखभाल करावी लागत आहे. त्यामुळेच ही बाब रेल्वेच्या दृष्टीने पथ्यावर पडणार आहे.
सध्याच्या तुलनेत आसन क्षमता घटणार
दिवा-रत्नागिरी मार्गावर सध्या एल एच बी दीनदयाळू प्रकारातील गाडी धावत आहे. या गाडीतील आसन रचना गर्दीच्या हंगामात प्रवाशांसाठी लाभदायक ठरत होती. सीटच्या वरही बसण्याची व्यवस्था असल्याने गर्दीच्या वेळी खाली जागा नाही मिळाली तर प्रवासी वर जाऊन बसू शकत होते. मात्र, नव्याने येणाऱ्या मेमूमध्ये अशी व्यवस्था नसेल. वर्षभर गर्दीने करून जाणाऱ्या या गाडीने प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी ही बाब मात्र, ठरणार आहे.
[…] […]