- कोल्हापूर विभागस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धा संपन्न
- निःपक्षपातीपणे निर्णय ; सुमारे सहाशे खेळाडू सहभागी
रत्नागिरी : निःपक्षपाती निर्णयासाठी तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला असल्याचे प्रतिपादन क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी केलं.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद द्वारा आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने कोल्हापूर विभागस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा 18 व 19 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल शिवाजी स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी अत्याधुनिक प्रणाली विभाग स्तरावर स्पर्धकांना खेळताना अनुभवता यावी यासाठी या स्पर्धा सेन्सर प्रणालीचा वापर करून घेण्यात आल्या. या स्पर्धेत पाच जिल्ह्यांमधील सुमारे सहाशे खेळाडू विभाग स्तरावर सहभागी झाले होते.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक वणवे तसचं जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सांगली जिल्ह्याचे सचिव आणि राज्य संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश चौधरी, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष तसच रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, सचिव लक्ष्मण कररा, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, पंच प्रमुख भरत कररा आणि कुणाल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
तायक्वांदो हा खेळ दिवसेंदिवस अधिक प्रगत होत असून जागतिक स्पर्धांमध्ये होणारे बदल लक्षात घेत इथल्या खेळाडूंना त्या तत्रांची ओळख व्हावी, सवय व्हावी तसचं या खेळात आपल्या देशातील मुलं अधिकाधिक पुढे जावीत यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती राज्य संघटना कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा यांनी दिली.

सेन्सर प्रणालीचा वापर यापुढे सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. शासनाच्या या स्पर्धेसाठी उपलब्ध निधीत उत्तम पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यासाठी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनने मोलाचं सहकार्य केल्याचं क्रीडाधिकारी शिंदे यांनी सांगितल.
