दमामे येथे गरजू विद्यार्थ्यांना ३२ सायकलींचे मोफत वाटप

दापोली : ‘आम्हाला आज खूप भारी वाटतंय… आमच्या नव्या सायकली खूपच छान आहेत. शाळा दूर असली, तरी आता चिंता नाही. आता आम्हाला शाळेत पायी जाण्याची गरज नाही…’ नवीकोरी गुलाबी लाल रंगाची सायकल हातात धरुन मोठ्या आनंदात समोर उभे असणारे ते विद्यार्थी बोलत होते. बोलता-बोलता सायकलची घंटी जोरात वाजवणाऱ्या त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत होता.

दापोली तालुक्यातील दमामे येथे असणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आजूबाजूच्या गावातील दुर्गम भागातून पायपीट करत अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. शनिवार १६ डिसेंबर २०२३ रोजी शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने आयोजित भव्य समारंभात इनव्हेनियो लाइफ टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून श्री. तेजस दाभोळे यांच्या प्रयत्नाने दमामे हायस्कूलला शिकणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना ३२ सायकलींचे वाटप मोफत करण्यात आले.

दमामे हायस्कूलमध्ये लांबून, दुर्गम भागातून पायपीट करत येणाऱ्या मुलाना सायकली मिळाल्याने तेथील पालक वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. सामाजिक वारसा जतन करणारे दापोलीतील समाजसेवक कौस्तुभ वणकर, प्रसाद दाभोळे, रोहन केळसकर, ओंकार खरे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच श्रीकांत सायकल मार्टचे प्रसाद कळसकर यांचेही सहकार्य लाभले.

सायकली वाटप करताना सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, विश्वस्त मारुती घाग, शांताराम खानविलकर, स्थानिक संचालक काकासाहेब खेडेकर, हरिश्चंद्र पावसकर, शाळेचे मुख्याध्यापक अतुल पितळे, दमामे गावाच्या सरपंच अर्पिता शिगवण, उपसरपंच गंगाराम हरावडे, भडवळे गावच्या सरपंच प्रीती खरे, उपसरपंच विजय नाचरे व शाळेचे आजी माजी विद्यार्थी हजर होते. या मदतीबद्दल पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE