रत्नागिरी, दि. २६ : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा हस्तक्षेप केंद्र, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी वैद्यकीय पथकांकडून 0 ते 18 वयोगटाच्या मुलांच्या विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी दि. 21 ते 23 डिसेंबर या कालावधित पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालय, उदय सामंत फौंडेशन व सायन हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये सायन हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध डॉ. पारस कोठारी व त्यांचे सहकारी यांच्या मार्फत शस्त्रक्रीयेकरिता पात्र झालेल्या एकूण ३५ मुलांवर विविध शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात यशस्वी करण्यात आल्या.
या शिबिराकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, आरबीएसके जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक आरती कदम, जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे व्यवस्थापक सागर बने व सर्व आरबीएसके आणि डीईआईसी अधिकारी वर्ग सहभागी झाले होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयात शीघ्र हस्तक्षेप केंद्र सुरु करण्यात आले आहे. बाळ जन्मल्यानंतर ते पहिली सहा वर्षे बाळाची वाढ व विकासाच्या दृष्टीकोनातून हा कालावधी फार महत्त्वाचा असतो. याच कालावधीत बाळाच्या विकासात विसंगती, अडथळा किंवा समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम बाळाच्या भविष्यातील वाढ आणि विकासावर होऊ शकतो. विकासाचे टप्पे उशिरा पूर्ण झाल्याने ही मुले इतरांपेक्षा थोडी वेगळी असतात. शारीरिक समतोल साधता न येणे, बसता न येणे, उभे राहता न येणे, चालता न येणे, बोलता न येणे, उशिरा बोलणे, सांगितलेले लक्षात न राहणे, आकडी येणे, एकटे राहणे आदी समस्या निर्माण होतात. अशा सर्व समस्यांचे निदान व उपचार या नविन केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
या केंद्रामध्ये बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सोशल वर्कर, सायकॉलॉजीस्ट, विशेष शिक्षक, ऑडीओलॉजीस्ट, दंत शल्य चिकित्सक, फिजिओथेरपीस्ट, ऑप्टोमैट्रीस्ट, स्टाफ नर्स, डेंटल टेक्निशियन आदी कार्यरत असणार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक सागर बने आरबीएसके जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक आरती कदम व संपूर्ण टिम या केंद्रात कार्यरत असणार आहे. या शीघ्र हस्तक्षेप केंद्राचा लाभ अधिकाधिक गरजू बालकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले यांनी केले आहे.
