- छञपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी गुहागरसह शृंगारतळी बाजारपेठ दणाणली; गोपाळगड किल्ल्यावर फडकविला भगवा ध्वज
गुहागर : छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय भवानी जय शिवाजी… अशा घोषणांनी गुहागर व शृंगारतळी परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागर तालुकावासीय, शिवप्रेमी यांच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शिव पादुकांच्या रथाला गुहागर व शृंगारतळीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किल्ले गोपाळगडावर असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत भगवे ध्वज फडकविण्यात आले.

यानिमित्त सकाळी शृंगारतळी व गुहागर येथून शिवरथ यात्रा काढण्यात आली. या शिवरथ यात्रेमध्ये तालुक्यातील शेकडो नागरीक, शिवप्रेमी व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. शृंगारतळी जानवळे फाटा येथून मोठ्या दिमाखात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून शिवरथ यात्रा काढण्यात आली. तसेच गुहागरमधून शिवाजी चौक येथूनही सकाळी १० वाजता शिवरथ यात्रा काढण्यात आली. गुहागर बस स्थानक येथे मळण येथील तरुणांनी कडाक्याच्या उन्हात शिवकालीन साहसी खेळाच्या कसरती सादर केल्या. शिवाय कीर्तनवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर मंडळाकडून वारकरी परंपरा म्हणून रिंगण घातले गेले. यामध्ये शिवप्रेमींनीहि सहभाग घेतला. छ. शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले घोड्यावर बसून रुबाबात चालणारे ठाणे वाडा येथून आलेले कुलदीप दिवटे या यात्रेत खास आकर्षण होते. त्यांचे सर्व ठिकाणी स्वागत केले जात होते. गुहागर येथून निघालेली शिवरथ यात्रा गुहागर बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन झाले. याठिकाणी शिवरायांच्या हस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन व जगदंबेची भेट झाली.

शृंगारतळी येथील रथयात्रेमध्ये चिखली मांडवकरवाडी येथील विद्यार्थ्यांचे झांज पथक, देखावा तर इंग्लिश मीडियम स्कूल जानवळे येथील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच मोटारसायकल रॅली यामुळे मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली. शृंगारतळी बाजारपेठमध्ये गुहागर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने सरबत, पाणी व खाऊ वाटप करण्यात आले. या यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन यानिमित्ताने सर्वांना पाहावयास मिळाले. गेली अनेक वर्षे येथील व गुहागर मुस्लिम मोहोल्यातील नागरिक या यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात.
शृंगारतळी बाजारपेठ मधून निघालेली शिवरथ यात्रा पालपेणे , पवारसाखरी, रानवी मार्गे अंजनवेल गोपाळगड येथे आणण्यात आली.

अंजनवेल गोपाळगड येथे स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवाय शृंगारतळी जानवळे येथील लिटिल चॅम्प स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावरील गीतावर नृत्य सादर केले. यावेळी पादुका पूजन व ध्वजारोहन करून शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.

या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, सेक्रेटरी निलेश गोयथळे, खजिनदार गणेश धनावडे, संचालक संतोष वरंडे, राजेंद्र आरेकर, विकास मालप, सुधाकर कांबळे, अंकुश विखारे, अलंकार विखारे, सिद्धीविनायक जाधव, अजय खाडे, आमिष कदम, मोहन संसारे, बबलू खानविलकर, संदीप मांडवकर, राहुल कनगुटकर, शामकांत खातू, बाबासाहेब राशिनकर, विशाल बेलवलकर आदींसह अनेकांनी मेहनत घेतली. तसेच तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागरवासीय उपस्थित होते. या संपूर्ण शिवरथ यात्रेसाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले.
