संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे असणाऱ्या चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कर्णेश्वर देवस्थान समिती कसबाने केले आहे.
कसबा येथील चालुक्यकालीन राजवटीत उभारण्यात आलेले श्री कर्णेश्वर मंदिर हे अप्रतिम कोरीव काम आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. केवळ देशातीलच नव्हे, तर विदेशातील पर्यटकही या मंदिरातील शिल्पकला पाहण्यासाठी येत असतात. कर्णेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो.
या वर्षी महाशिवरात्रोत्सव ८ मार्च रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त मंगळवार दिनांक ५ मार्च ते रविवार दिनांक १० मार्च या दरम्यान दररोज कर्णेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यादरम्यान रोज सकाळी आठ वाजता श्रींची पूजा अभिषेक, रोज सायंकाळी साडेसात वाजता आरती मंत्र पुष्पांजली तसेच बुधवार ६ मार्च रोजी लघुरुद्र स्वाहाकार, ७, ९, १० मार्च रोजी रात्र साडेनऊ वाजता ह भ प श्याम बुवा धुमकेकर नागपूर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. श्याम बुवा धुमकेकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. या कीर्तनाला संवादिनी साथ चैतन्य पटवर्धन, तर तबलासाथ केदार लिंगायत हे देणार आहेत. तर रात्री दहा वाजता श्रींचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कर्णेश्वर मंदिर देवस्थान समितीने केले आहे.