- संगणक अभियंता अधिकारी -२ पटकावला राज्यात पाचवा क्रमांक
लांजा : राज्य सेवा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून महाराष्ट नगर परिषदेमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तळवडे येथील कु. निवेदिता नंदकुमार आंबेकर हिने संगणक अभियंता अधिकारी क्लास 2 श्रेणीमध्ये पाचवे नामांकन प्राप्त करून यश संपादित केले आहे.
जिद्द, चिकाटी, जबरदस्त मेहनत व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर निवेदिता आंबेकर हिने राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. गेली ४-५ वर्षे MPSC राज्यसेवेसारख्या अनेक स्पर्धांना सामोरे जात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती देऊन ही अपेक्षित यश हुलकावणी देत असताना देखील अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी, मेहनत व संयम ठेवून निवेदिता ने अखेर यश खेचून आणलेच. या कालावधीत तिचे आई-वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे व कायम उभे राहिले, तिच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला निवेदिताच्या या प्रयत्नाने समाजातील सर्वच घटकांना प्रोत्साहन मिळत आहे.
सेवानिवृत्त लिपिक नंदू आंबेकर आणि सेवानिवृत्त न्यायालयीन अधीक्षक सौ आंबेकर यांची ती कन्या आहे. लांजा हायस्कूलमध्ये खो खो खेळातील राज्यस्तरीय खेळाडू आहे. लांबउडी या क्रीडा प्रकारात तिने राज्यस्तरीय यश मिळवले होते. दहावी शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत जिल्हात प्रथम आली होती. महाड येथे संगणक अभियंता पदवी प्राप्त करून तिने सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते त्यासाठी तिने पुणे येथे अभ्यासिकेमध्ये विविध स्पर्धा परीक्षा यांची तयारी केली. गेली काही वर्ष ती कठोर परिश्रम करीत होती. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही कधी मुलाखतीमध्ये अपयश आले तरीही न डगमगता स्पर्धा परीक्षा देत राहिली अखेर तिने यश संपादित केले आहे. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
