- कोकण रेल्वेच्या पॅसेंजरसाठी आधीप्रमाणे मेल/एक्सप्रेसचेच मिळतेय तिकीट; प्रवाशांना भुर्दंड
रत्नागिरी : फेब्रुवारी अखेरपासून देशभरातील पॅसेंजर गाड्यांना कोव्हीड कालीन तिकीट आकारणी होऊ लागली आहे. यामुळे आता पॅसेंजर गाड्यांचे करंट/ जनरल श्रेणीतील तिकीट 45 ते 50 टक्के स्वस्त झाले आहे. मात्र रेल्वेच्या यूटीएस अँपवर अजूनही पॅसेंजर गाडीसाठी पूर्वीप्रमाणेच मेल एक्सप्रेसचे तिकीट घ्यावे लागत आहे. याचवेळी काउंटरवर मात्र ऑडिनरी श्रेणीचे तिकीट दिले जात आहे.
विशेषत : अप दिशेच्या पॅसेंजर गाडीच्या प्रवाशांना फटका
रेल्वेने पॅसेंजरच्या तिकिटात बदल केल्यानंतर मुंबईतून डाऊन दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर गाडीच्या वेळे आधी रेल्वेच्या नियमानुसार पॅसेंजर गाडीचसाठी यु टी एस ॲपवर ऑर्डिनरी तिकिटाचा ऑप्शन दाखवत आहे. मात्र अप दिशेच्या गाडीसाठी उदा. रत्नागिरी ते दिवा दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीच्या वेळेआधी ऑर्डिनरी श्रेणीचे तिकीट बुक करायचे असल्यास हा ऑप्शनच दाखवत नाही. त्यामुळे ॲपवरून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना आजही पूर्वीप्रमाणेच ऑर्डिनरी तिकीटा ऐवजी मेल एक्सप्रेसचे अधिकचे तिकीट घ्यावे लागत आहे. रेल्वेने ॲपवर अपडेटेशनचे काम वेळीच करून सर्वसामान्य प्रवाशांना होणारा तिकीट भुर्दंड टाळावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे
दिनांक 27 फेब्रुवारी 2024 पासून रेल्वेने डेमु, मेमू / पॅसेंजर गाड्यांसाठी कोविड महामारीपूर्वी जसे सर्वसाधारण श्रेणीचे तिकीट दिले जायचे तसे देणे सुरू केले आहे. मात्र, कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विशेषतः अप दिशेने धावणाऱ्या पॅसेंजर गाडीसाठी रेल्वेच्या अधिकृत यु टी एस ॲपवर हा बदल अजूनही झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच पॅसेंजर गाडीसाठी ऑर्डीनरी प्रकारातील तिकीट ऐवजी मेल एक्सप्रेसचे तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. याचवेळी रेल्वेच्या तिकीट काउंटर वर मात्र प्रवाशांना रेल्वेच्या सुधारित नियमानुसार 40 ते 50 टक्क्यांनी कमी झालेले तिकीट दिले जात आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र त्याच गाडीचे त्याच अंतराचे यु टी एस ॲपवर मात्र पूर्वीप्रमाणेच मेल एक्सप्रेसचे तिकीट दाखवत आहे.