देवरुख दि. २१ : कोकणात पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन स्थापन करण्यात आलेल्या धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि देवरूखमधील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संकल्पनेतून पहिल्यांदाच धनेशमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २३ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत देवरुखमध्ये हे संमेलन पार पडेल. या संमेलनात पश्चिम घाटात अधिवास असणाऱ्या संकटग्रस्त धनेश पक्ष्याच्या संवर्धनाची दिशा ठरवली जाणार आहे.

जंगलतोड आणि हवामान बदलामुळे धनेश पक्षी संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट झाला आहे. देवरुखमधील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ ही नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन बंगलोर या संस्थेतील संशोधकांच्या साहाय्याने रत्नागिरी जिल्ह्यात धनेश पक्ष्यावर संशोधन आणि जनजागृतीचे काम करत आहे. विशेष करुन धनेश पक्ष्यांचे अधिवास संवर्धित करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. या संस्थेच्या संकल्पनेमधून राज्यातील पहिल्या धनेशमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला सृष्टीज्ञान संस्था, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन, सह्याद्री निसर्ग मित्र – चिपळूण, एन व्ही इको फार्म गोवा, महाराष्ट्र वन विभाग आणि गोदरेज कन्झुमर प्रोडक्ट यांचे सहकार्य मिळाले आहे.
धनेशाच्या भविष्यासाठी पाऊल
– प्रतीक मोरे, कार्यकारी संचालक,
धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही संवाद सेतू तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणामध्ये वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्ती यानिमित्ताने संघटित होतील आणि धनेश पक्ष्याच्या संवर्धनाची दिशा ठरवतील. या पक्ष्याच्या अधिवास संरक्षणाला आणि जनजागृतीच्या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप मिळावे म्हणून आम्ही या संमेलनाचे आयोजन केले आहे.
सह्याद्री संकल्प सोसायटी
या संमेलनामध्ये कोकणातील धनेश पक्ष्यांच्या नोंदी, संवर्धनाची गरज, हवामान बदलाचा धनेश पक्ष्यांच्या संख्येवर होणारा परिणाम या विषयांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. या सोबतच खासगी मालकीच्या वनक्षेत्रात असणाऱ्या धनेशांच्या घरट्यांचे संवर्धन, त्यामधील आव्हाने आणि त्यासाठीच्या संवर्धनाची दिशा यावर चर्चा होईल. केवळ चर्चा न करता कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाचा पुढच्या दहा वर्षांचा प्राथमिक आराखडा या माध्यमातून तयार केला जाणार आहे.
याचबरोबर कोकणात धनेशाच्या घरट्यांचे संवर्धन करणाऱ्या स्थानिक गावकरी मंडळी आणि ग्राम पंचायती यांचा धनेशमित्र या पुरस्काराने सन्मान केला जाईल. हे संमेलन देवरुखमधील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एस.के.पाटील सभागृहात पार पडेल.
