रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे प्रवेश नियामक प्राधिकरण अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्य सचिव श्री. जे. पी. डांगे यांनी नुकतीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य विद्यालय, शिरगांव, रत्नागिरी ला सदिच्छा भेट दिली. त्यांचे मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदुलकर यांनी स्वागत केले.
श्री डांगे यांनी यावेळी मत्स्य महाविद्यालयाच्या पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. महाविद्यालयात होत असलेल्या पारदर्शक प्रवेश प्रक्रियेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मत्स्य महाविद्यालयात देशाच्या सर्व राज्यातील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रम शिक्षणासाठी येतात हे जाणून त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. इंदुलकर यांनी यांना मत्स्य महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण आणि सामाजिक वाटचालीबद्दल श्री. डांगे यांना माहिती दिली. त्यानंतर श्री. डांगे यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालय व इतर विभागांबद्दल माहिती जाणून घेतली. याप्रसंगी पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम समन्वयक डॉ. दबीर पठाण उपस्थित होते.