- जादा फेऱ्यांसाठी आगाराकडे बसेस नसल्याचे स्पष्टीकरण
- प्रवाशांवर खासगी बस वाहतुकीकडे वळण्याची वेळ
लांजा : उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासाठी लांजा आगराने उन्हाळी जादा बसेस सोडण्याचे नियोजन न केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. गतवर्षी नियोजन होते. यावर्षी जादा बसेस नसल्याने खासगी बस वाहतूकदारांना जादा व अवाजवी भाडे देऊन आधार घेवा लागत आहे. रत्नागिरी विभागात जादा बसेस उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद नसल्याचे पुढे आले आहे. आगारकडे जादा फेऱ्यांसाठी बस नसल्याने आम्ही काहीच करू शकत नसल्याचे लांजा एसटी स्थानकातून सांगण्यात आले आहे.
यावर्षी वाढत्या उष्मांकामुळे चाकरमानी हे सहपरिवार गावी मे महिना सुट्टीसाठी आले आहेत. लांजा तालुक्यात सर्व गावात मुंबई, पुणे येथील नागरिक मूळ गावी आले आहेत. कोकण रेल्वे आरक्षण फुल्लहोऊन गाड्यांना मोठी गर्दी असल्याने रेल्वेला पर्याय म्हणून एसटी बसेसना पसंती देत आहेत. त्यात महिलाना एसटीकडून प्रवास भाडे सवलत असल्याने अधिक पसंती आहे. एसटी महामंडळाने अधिक महसूल वाढीसाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील विभागात लांजा आगार याबाबत दुर्लक्षित आहे. परतीच्या प्रवासासाठी लांजा आगराने जादा बसेस सोडण्याची मागणी होत आहे.
