लोकसभा निवडणूक २०२४ | रत्नागिरी-सिंधुदुर्गात पहिल्यांदाच फुलले भाजपचे ‘कमळ’
- महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी घोषित
रत्नागिरी : लोकसभेच्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झाले आहेत. या मतदारसंघात प्रथमच भाजपचं कमळ फुललं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. महायुतीच्या नारायण राणे यांनी 47 हजार 858 इतके मताधिक्य घेऊन इंडिया आघाडीचे (उबाठा) उमेदवार विनायक राऊत यांच्यावर विजय मिळवला आहे. विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत.
एफ सी आय च्या च्या एमआयडीसी, मिरजोळे येथील गोदामात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात ही चुरशीची लढत रंगली होती. सुरूवातीच्या पहिल्या फेरीत विनायक राऊत 462 मतांनी आघाडीवर राहिले. त्यानंतर मात्र पुन्हा नारायण राणे यांनी तब्बल 2 हजार 305 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी राऊत यांनी तिसर्या फेरीत मोडीत काढली व अवघ्या 30 मतांची आघाडी मिळविली होती.
यावेळची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले. मात्र, चौथ्या फेरीनंतर नारायण राणे यांनी आघाडी घेत ती अगदी 24 व्या फेरीपर्यंत आणि शेवटच्या 25 व्या फेरीत मात्र राणे 2 हजार मतांनी मागे आले. शेवटी 47 हजार 858 मतांनी राणे विजयी ठरले.