- विन्हेरे ते दिवाणखवटीदरम्यानची घटना
- चार दिवसात दुसऱ्यांदा कोकण रेल्वेच्या वाहतुकीत व्यत्यय
खेड : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान मार्गावर रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक चार दिवसात दुसऱ्यांदा विस्कळीत झाली आहे. चारच दिवसापूर्वी गोव्यात पेडणे येथील बोगद्यात पाणी आल्यामुळे रेल्वेची वाहतूक बंद पडली होती.

जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असतानाच रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे ते दिवाणखवटी स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे टनेलनजीक रेल्वे रुळांवर दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळतात रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी रवाना झाली.
दरम्यान, मार्गावर दरड कोसळल्यामुळे मुंबईतून त्रिवेंद्रमकडे जाण्यासाठी निघालेली डाऊन नेत्रावती एक्सप्रेस करंजाडी स्थानकात तर गोव्यातून मुंबईला जाणारी अप मांडवी एक्सप्रेस खेडला थांबवून ठेवण्यात आली. त्या पाठोपाठ रत्नागिरी स्थानकावर मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस तसेच मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस रोखून ठेवण्यात आली.
