केअर ऑफ नेचर संस्थेच्या रुपेश पाटील यांनी वाचविले तिबोटी खंड्याचे प्राण!
- तिबोटी खंडया रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून परिचित
- रुपेश पाटील यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक
उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : रविवार दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी पनवेल मधील करंजाडे येथे कॉलेज फाट्याजवळ असलेल्या तलावात पडलेला ‘तिबोटी खंड्या’ नावाचा पक्षी आढळून आला. याला इंग्रजीत ‘ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर’ (ODKF) म्हणतात. ‘केअर ऑफ नेचर’ या निसर्ग सेवी संस्थेचे चिंचपाडा शाखा अध्यक्ष रुपेश पाटील हे सकाळी पोहण्यासाठी तलावात गेले असता आपला जीव वाचविण्यासाठी पाण्यातून बाहेर पडण्याकरिता हालचाली करत असलेला हा असहाय पक्षी त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी या पक्षाला पाण्यातून काढून लगेचच ‘केअर ऑफ नेचर महाराष्ट्र राज्य’चे संस्थापक राजू मुंबईकर यांना संपर्क करून ही माहिती दिली. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार करून पक्षी सुस्थितीत झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
पश्चिम घाटात रहिवासी असलेला हा ‘तिबोटी खंड्या’ विणीच्या हंगामात रायगड जिल्ह्यात आलेला पाहायला मिळतो. ‘तिबोटी खंड्या’ या पक्षाला रायगड जिल्ह्याचा ‘जिल्हा पक्षी’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. विविध रंगाचे अतिशय विलोभनीय असं सौंदर्य प्राप्त असलेला ‘तिबोटी खंड्या’ दरवर्षी जून ते सप्टेंबर या त्याच्या विणीच्या काळात मोठ्या प्रमाणात कोकणात घरटी करताना पाहायला मिळतो. याच्या निरिक्षणासाठी कर्नाळा अभयारण्य हे पक्षी प्रेमींचे सर्वात पसतींच्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. आपल्या पिल्लांना भरविण्यासाठी जंगलातून पाली, लहान खेकडे, बेडूक इ. घेऊन येतानाच क्षण अगदी अनुभव घेण्यासारखे असतात. आणि विणीच्या अशावेळी या पौढ पक्षाला मिळालेलं हे जीवदान खूप महत्त्वाचे मानले जातेय.