खो-खो स्पर्धेत देवरूख महाविद्यालय दुहेरी मुकुटाचा मानकरी
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाने १९ वर्षाखालील गटात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मुले आणि मुली दोन्ही गटाचे विजेतेपद प्राप्त करून दुहेरी मुकुटाचा सन्मान प्राप्त केला.
या स्पर्धा नुकत्याच देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध शाळांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
मुलांच्या संघाने उपांत्य सामन्यात माखजन कनिष्ठ महाविद्यालयाचा १ डाव आणि १२ गुणांनी विजय प्राप्त केला. अंतिम सामन्यात दादासाहेब सरफरे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबी संघावर १६-१२ असा ३:५० मिनिटे वेळ राखून विजय प्राप्त केला. गतवर्षी देवरुख महाविद्यालयाचा संघ कोल्हापूर विभागीय स्पर्धेत उपविजेता ठरला होता.
महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपांत्य सामन्यात दादासाहेब सरफरे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबी संघावर १ डाव आणि ३ गुणांनी विजय संपादन करून अंतिम सामन्यात कसबा कनिष्ठ महाविद्यालयाचा १३-१० असा पराभव करून विजय प्राप्त केला. महाविद्यालयाचे दोन्ही संघ जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
महाविद्यालयाच्या दोन्ही संघांना संगमेश्वर तालुका क्रीडा समन्वयक अभिजीत कदम, न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक तानाजी कदम आणि महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले, ॲड. वेदा प्रभूदेसाई, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.