- राज्यभरातील 28 जिल्ह्यातील 535 खेळाडूंचा सहभाग
गुहागर : सावर्डे डेरवण येथे आयोजित पुनीत बालन गृप प्रस्तूत राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्यभरातून आलेल्या 535 मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवला आहे. या खुल्या ज्यूदो स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनने केले असून रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूदो संघटनेने त्यास सहकार्य केले आहे.
डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटेबल ट्रस्ट क्रीडा संकुल यांच्या विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या या स्पर्धा 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान संपन्न होतील. या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू राज्याच्या संघात निवडले जाऊन ते राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करतील. खेळाडूंची वजने नोंदणी आणि इतर बाबींची पूर्तता आज झाल्यानंतर दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेला आज मोठया दिमाखात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक, ऍड. धनंजय भोसले, छत्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ मलखांब पट्टू शांताराम जोशी, डेरवण क्रीडा विभागाचे संचालक श्रीकांत पराडकर, गुहागर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष मनोज बावधनकर, दैनिक लोकमतचे संकेत गोयथळे, रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूदो संघटनेने अध्यक्ष निलेश गोयथळे, उपाध्यक्ष गणेश धनावडे, डॉ. गणेश शेटकर, अनिल सकपाळ, प्रमोद मेंडन आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी राज्यातील २८ जिल्ह्यातून 535 खेळाडूंच्या वयोगट 15 ते 18 वर्षाखालील कॅडेट गटात 144 मुले आणि 129 मुली तर वयोगट 15 ते 21 वर्षाखालील ज्युनियर गटामध्ये 145 मुले आणि 117 मुली सहभागी झालेले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड, लातूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, अहमदनगर, धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग यासह शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीचा संघ आणि यजमान रत्नागिरी जिल्ह्याचा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत.
स्पर्धेसाठी मुंबईचे प्रमोद मेंडन यांची स्पर्धा संचालकपदी नियुक्ती करण्या आलेली आहे. नुकत्याच हॉन्गकॉन्ग येथे आयोजित स्पोर्ट्स-कमिशन या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या दर्शना लखानी यांच्या तांत्रिक व्यवस्थापनाखाली या स्पर्धा ऑलिम्पिकसह इतर सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या स्पर्धा संचालन पद्धतीप्रमाणे डेरवण येथे या स्पर्धा घेतल्या जातील. राज्यातील तज्ञ पंच योगेश शिंदे, निखील सुवर्णा, जयेंद्र साखरे, यांच्यासह सुरेश कनोजिया, रविंद्र पाटील आणि शैलेश टिळक हे आंतरराष्ट्रीय पंच प्रमुख सामनाधिकारी आहेत.
स्पर्धकांच्या भोजन आणि निवासाची सोय ट्रस्टच्या वतीने सवलतीच्या दरात करण्यात आलेली असून बास्केटबॉल स्टेडीयममध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार तीन मॅट अरीनावर या स्पर्धा घेतल्या जातील. स्पर्धेचे यु-ट्यूबवरील महाज्यूदोच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण उपलब्ध असून ज्यूदोपटू महेश गदादे सामन्यांचे दृकश्राव्य संयोजन करत आहे.