https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

परतीच्या वादळी पावसाचा रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाला फटका

0 1,720

रत्नागिरी : विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला तडाखा बसला आहे. येत्या काही दिवसात राज्य सरकारच्या निधीमधून होत असलेल्या सुशोभीकरणाचा उद्घाटन सोहळा होणार होता.

रविवारी सायंकाळी उशिराने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजंच्या जोरदार कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे बेसावध असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरणाचे काम राज्य शासनाच्या निधीमधून सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून हे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने त्याआधी रेल्वे स्थानकावरील या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळाहोण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे रत्नागिरी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुशोभीकरण कामांतर्गत बसवण्यात आलेल्या पीओपीच्या उडाल्या असून काही शीट्स फाटून नुकसान झाले आहे.

उद्घाटनाच्या आधीच सुशोभीकरण कामाची अशी स्थिती झाल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे प्रवाशांनी कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली. वादळ सुरू असताना नव्याने बसवण्यात आलेल्या पीओपीच्या शीट्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उडतानाचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.