चिपळूण : भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला जाणारा शाळेतील वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारा उत्सव म्हणजे वाचन प्रेरणा दिन!
वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड चिपळूण प्रशालेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध लेखक आणि पैसा फंड हायस्कूल येथील जेष्ठ कलाअध्यापक श्री.जितेंद्र पराडकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युनायटेडच्या गुरुकुल विभागातील सुरभी चितळे(८वी) अवंतिका जाधव (७वी)अवनी भुवड(७वी) चंद्रभान यादव(५वी) उदय पवार(५वी) आणि आयुष कानडे(५वी)या सहा विद्यार्थ्यांनी पराडकर सरांची अतिशय उत्तम तयारीने प्रकटपणे मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला.

या मुलाखतीमधून बालवयापासून वडिलांच्या शिस्तीच्या देखरेखीखाली कलेची आवड जोपासणारा विद्यार्थी ते आज नऊ दहा स्वतःची पुस्तके प्रकाशित झालेला लेखक असा पराडकर सरांचा विलक्षण प्रवास दोन अडीचशे विद्यार्थ्यांसमोर सहज संवादातून उलगडला. या मुलाखतीसाठी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री.धनंजय चितळे व संस्था प्रतिनिधी श्री.अभय चितळे पूर्णवेळ उपस्थित होते.
तत्पूर्वी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने युनायटेड चिपळूणच्या ग्रंथालय विभागामार्फत ०१ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ‘ वाचन पंधरवडा ‘ आयोजीत केला होता.यामध्ये मुलांना ग्रंथालय विभागातून प्रत्येकी एक पुस्तक वाचनासाठी देऊन ते वाचनासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आली. या आठवड्याभरात मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचे पुस्तक परीक्षण,परिचय आणि पुस्तक रसग्रहण मुलांनी कसे करावे याविषयीची मुलांना माहिती सांगण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. ०८ ऑक्टोबर रोजी पाचवी ते सातवीच्या मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचे पुस्तक परिचय आणि आठवी ते दहावीच्या मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचे रसग्रहण नेमून दिलेल्या वेळेत शाळेकडून पुरवण्यात आलेल्या कागदावर लिहून दिले. शंभरपेक्षा जास्त उत्साही मुलामुलींचा सहभाग असलेल्या या अनोख्या रसग्रहण व पुस्तक परिचय स्पर्धेतून मराठी भाषा विषय शिक्षकांच्या सहकार्याने दोन्ही गटातून सर्वोत्तम तीन तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
श्री जितेंद्र पराडकर,श्री धनंजयजी चितळे, श्री.अभयजी चितळे, प्रशालेचे उप मुख्याध्यापक श्री.बनसोडे व पर्यवेक्षक श्री.मुंढेकर सर इत्यादी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्याना पारितोषिक म्हणून श्री.पराडकर यांनी लिहिलेली पुस्तकेच देण्यात आली.
श्री.धनंजय चितळे यांनी आपल्या मनोगतातून वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मुलांनी लवकरच स्वतः लिहिलेल्या साहित्यासाठीचा कोपरा तयार करण्याविषयीचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्राची भावे यांनी केले
कार्यक्रमाचे नियोजन श्री.राजेश धापसी सर व ग्रंथपाल सौ. तांबे मॅडम यांनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील मॅडम व गुरुकुलचे विभाग प्रमुख श्री मंगेश मोने सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले व पूर्ण आयोजनात गुरुकुल विभागातील विदयार्थी,अध्यापक यांचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्राची भावे यांनी केले
