खेडमधील रोहिणी पाटील यांचीही तीन पदकांची कमाई
लांजा : अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत लांजा येथील वनरक्षक आणि राजापुर सुकन्या श्रावणी प्रकाश पवार यांनी ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात दोन ब्राँझ पदकाची कमाई करत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. खेड तालुक्यात कार्यरत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या वनरक्षक रोहिणी पाटील यांनीही 2 सिल्वर व 1 ब्राँझ पदक प्राप्त केले आहे.
छत्तीसगडमधील रायपूर येथे 27 वी अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरातून २८ राज्यातील खेळाडू सहभागी झाले. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना चिपळूण वनविभाग अंतर्गत लांजा येथील श्रावणी पवार यांनी 400 मिटर चालणे या क्रीडा प्रकारात 1 ब्राँझ पदक तर हार्डलस क्रीडा प्रकारात 1 ब्राँझ पदक प्राप्त केले. गतवर्षी झालेल्या अखिल भारतीय क्रीडा स्पर्धेत वनरक्षक श्रावणी पवार यांनी सुवर्णपदक पटकावले होते.
श्रावणी पवार राजापूर तालुक्यातील मंदरुळ गावची सुकन्या आहेत. श्रावणी यांनी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर ॲथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू म्हणून चमकल्या होत्या त्या लांजा वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय खेळाडू म्हणून वन विभागात वनरक्षक या पदावर त्या शासकीय नोकरीत रुजू झाल्या आहेत. लांजा येथे वनरक्षक कर्तव्य बजावताना त्यांनी वन विभागात धाडसी कामगिरी केली आहे. वन विभागाच्या विविध क्रीडा प्रकारात त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे दाखवली आहे. जिल्ह्यातील असलेल्या खेड मधील रोहिणी पाटील यांनी देखील वनविभागाच्या या स्पर्धेत बाजी मारली आहे. तीन पदके प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
लांजाच्या श्रावणी पवार यांचे जिल्हा वन अधिकारी सौ. गिरिजा देसाई, सहाय्यक वनाधिकारी प्रियंका लगड यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे जिल्हा वन विभागाला अभिमान असल्याचे सांगण्यात आले. क्रीडा स्पर्धेतील वनविभागाच्या या यशाबद्दल श्रावणी पवार आणि रोहिणी पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.