https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

संगमेश्वरातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावार अनेक अडथळे

0 106
  • बेदारकारपणे रस्त्याची खोदाई
  • बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार
  • गाईड स्टोन उखडले

संगमेश्वर दि. १२ : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वर देवरुख मार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या राज्यमार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुरवस्था झाली होती. या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडले. याबाबत वाहनचालक आणि प्रवाशांनी सातत्याने ओरड केल्यानंतर या मार्गाची काही प्रमाणात डागडूजी केली गेली. मात्र पावसाळा सरताच खाजगी कंपन्यांनी इंटरनेटच्या केबल टाकण्यासाठी संगमेश्वर देवरुख मार्गाची अनेक ठिकाणी बेदरकारपणे खुदकाम सुरू केली आहे. या खोदाईत रस्त्यालगत असणारे गाईड स्टोन उखडून टाकण्यात आले असून ठिकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. देवरुख येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गेले काही दिवस संगमेश्वर देवरुख मार्गावर अनेक ठिकाणी एका खाजगी कंपनीकडून इंटरनेटची केबल टाकण्यासाठी खोदाई करण्याचे काम सुरू आहे. याबाबत राज्य मार्गावरील गावात असणाऱ्या ग्रामपंचायतींना देखील विश्वासात घेतले गेले नसल्याने अथवा त्यांच्याकडून कोणतीही लेखी परवानगी घेतली नसल्याने काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नळ पाणी योजनेचे पाईप तुटले आहेत. लोवले, बुरंबी, करंबेळे आदी गावातून केबल टाकण्यासाठी खोदलेले मोठे चर व्यवस्थित न बुजवल्याने आता धोकादायक बनले आहेत. तर काही ठिकाणी अपघात सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मयुरबाग येथे खोदलेल्या डांबरी रस्ता खचू लागला आहे .

यावर्षी लोवले बस थांबा येथे ओढ्याजवळ धोकादायक बनलेली भिंत नव्याने उभारण्यात आली. खाजगी कंपनीने इंटरनेटची केबल टाकताना या संरक्षण भिंतीजवळ खोदकाम करून येथील रस्ता धोकादायक करून ठेवला आहे. रस्त्याच्या बाजूने खोदकाम करताना सर्व गाईड स्टोन उखडून टाकल्याने रात्रीच्या वेळी वाहनांना रस्ता समजणे कठीण होत आहे. याबरोबरच खोदलेले चर बुजवताना योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने रस्त्यावर राहणारी माती वाहने गेल्यानंतर धुळीच्या रूपात घरांमध्ये आणि दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जात आहे.

याबाबत लोवले येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केबल टाकणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे, ‘ आम्ही बांधकाम विभागाची परवानगी काढली आहे त्यामुळे आम्हाला अन्य कोणाच्याही परवानगीची गरज नाही असे उत्तर दिले ‘. पावसाळ्यात संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गाची साखरप्यापर्यंत अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. वाहनचालकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर काही प्रमाणात या मार्गाची दुरुस्ती केली गेली. आता मात्र खाजगी कंपनीची केबल टाकण्यासाठी रस्त्याची वाताहात करण्याचे काम सुरू असल्याने याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाच्या सचिवांकडेच लेखी तक्रार करण्यात असल्याचे प्रवासी संघटनेचे परशुराम पवार यांनी सांगितले.

संगमेश्वर ते साखरपा दरम्यान रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी दगड आणि मातीचे ढीग टाकून ठेवण्यात आले आहेत. बांधकाम करताना अनावश्यक असणारे सर्व साहित्य या रस्त्याच्या दुतर्फा टाकून ठेवले जात असल्याने अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे सर्व कमी म्हणूनच महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने संगमेश्वर नजीक लोवले ग्रामपंचायतच्या हद्दीत एकूण तीन ठिकाणी रस्त्यालगत लोखंडी आणि सिमेंटचे पोल टाकून ठेवले आहेत. या पोलमुळे आता रस्त्याला साईड पट्टीच शिल्लक राहिलेली नाही. महावितरणने आपल्या ठेकेदाराला बेदरकारपणे रस्त्यालगत उतरून ठेवलेले पोल उचलण्यास सांगावे अशी मागणी ही पादचार्‍यांनी केली आहे. या सर्व बाबींकडे देवरूखच्या बांधकाम विभागाकडून हेतूत: दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल वाहनचालकांसह प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून याबाबत बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदनही दिले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.