https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मतदारांना मतदाना दिवशी सुट्टी जाहीर

0 26


रत्नागिरी, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे.

रत्नागिरी : टपाली मतदानासाठी रत्नागिरी केंद्रावर लागलेली मतदारांची रांग.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील, असे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनांमधील कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.
मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामन्यता वेतन मिळणार नाही, या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्यादिवशी त्याला सुट्टी दिली नसती, तर त्यांनी काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल. जर एखाद्या नियोक्त्यांने उपकलमाच्या तरतुदीचे उल्लघंन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल.
हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही, ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे, त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.
वर नमूद केल्यानुसार मतदारास मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, संबंधित नियोक्त्याविरुध्द नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेस, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालकांनी, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, असे आवाहनही श्री. आयरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02352-223209 वर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.