देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
- एकनाथ शिंदे अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेले काही दिवस राज्यात राजकीय खलबते घडून येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच विविध राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
शपथविधीनंतर फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयात पोहोचले आणि त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला.
राज्यात नव्या सरकारचा शपथविधी झाला आणि त्यानंतर काही मिनिटातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहून फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमध्ये राज यांनी फडणवीसांना खरे तर २०१९ साली संधी मिळायला हवी होती. पण तेव्हा आणि २०२२ मध्ये जे काही घडले त्यामुळे त्यांची संधी हुकल्याचा राज ठाकरे यांनी उल्लेख केला.