कोकण रेल्वे आणि एनडीआरएफ यांची रत्नागिरी येथे संयुक्त प्रात्यक्षिके
रत्नागिरी : आपत्कालीन स्थितीत कशा पद्धतीने निर्णय घेत संकटकालीन परिस्थितीवर मात करायची याची प्रात्यक्षिके नुकतीच एन डी आर एफ व कोकण रेल्वेच्या टीमने रत्नागिरीत करून दाखवली.यावेळी कोकण रेल्वेसह रत्नागिरी जिल्हा प्रशासनातील विविध खात्यांचे कर्मचारी ,अधिकारी उपस्थित होते.
आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर सर्वप्रथम जिल्हाप्रशासनाच्या विविध विभागांना सतर्क होऊन काम करावे लागते.परिस्थिती गंभीर असेल तर अशा स्थितीत एन डी आर एफ च्या टीम ला पाचारण केले जाते.नुकतीच एन डी आर एफ च्या एका टीम ने रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत कोकण रेल्वे सह विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर केली.कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.कोकण रेल्वेच्या विभागीय कार्यालयात एन डी आर एफ आणि विविध खात्यातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. यामध्ये आपत्कालीन स्थितीत निर्माण होणारी स्थिती, घ्यायचे निर्णय,खात्यांमधील परस्पर समन्वय यावर चर्चा करण्यात आली.
यानंतर एन डी आर एफ च्या टीम ने कोकण रेल्वेच्या परिसरात आपत्कालीन स्थितीत त्यांची टीम कशा पद्धतीने काम करते,अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्या व्यक्तीची कशा पद्धतीने सुटका करून त्यांना उपचारासाठी पाठवले जाते याची प्रात्यक्षिके सादर केली.
कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हि यावेळी प्रात्यक्षिके सादर केली. कोकण रेल्वेच्या मार्गावर मार्गावरून खाली उतरलेल्या रेल्वे बोगी ला पूर्ववत मार्गावर आणणे यासह अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन कसे केले जाते याची प्रात्यक्षिके ही दाखवण्यात आली.
यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रशासन चा आपत्कालीन विभाग,तहसीलदार कार्यालय,नगर परिषद अग्निशामक पथक,जिल्हा आरोग्य विभाग,नागरी संरक्षण दल,रत्नागिरी पोलीस दल,रेल्वे सुरक्षा दलाचे जवान असे विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कोकण रेल्वेच्या वतीने रेल्वेचे मुख्य संरक्षा अधिकारी नंदू तेलंग व उपमुख्य संरक्षा अधिकारी बी जी मदनायक, विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी एन डी आर एफ चे वरिष्ठ अधिकारी राजू प्रसाद गौड व जवानांचे स्वागत केले.एन डी आर एफचे 25 जवान या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते.