रत्नागिरी : रत्नागिरी ते दिवा मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडीच्या डब्यात इतर प्रवासी नसल्याचा गैरफायदा घेत एका तरुणाने या गाडीतून खेडपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवासी तरुणीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने गडबडून गेलेल्या पीडित तरुणीने रेल्वे पोलिसांकडे धाव घेताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित तरुणाला चिपळूण येथे पकडले.
या संदर्भातील अधिक माहितीनुसार रत्नागिरी ते दिवा मार्गावर धावण्यासाठी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणाऱ्या पॅसेंजर गाडीमध्ये एक तरुणी खेडमध्ये महाविद्यालयात जाण्यासाठी प्रवास करीत होती. पॅसेंजर गाडीच्या डब्यात इतर प्रवासी नसल्याचा गैरफायदा घेत एका तरुणाने अचानक तरुणीची मान पकडून तिचा विनयभंग केला. यावेळी झालेल्या झटापटीत संशयित तरुणाने तरुणीला ढकलून दिले. त्यानंतर त्याने घटना घडलेल्या डब्यातून पळ काढला.
दरम्यान, या घटनेनंतर तरुणीने नातेवाईकांशी संपर्क साधल्यावर रेल्वे पोलिसांकडे हे प्रकरण गेले. पोलिसांनी तातडीने रत्नागिरी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे या गाडीतून पुढे चिपळूणपर्यंत गेलेल्या संशयित तरुणाला चिपळूण स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांनी उतरवून घेत रत्नागिरीला आणले. निम्रान असे या संशयित तरुणाचे नाव आहे.
या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
