- मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमीकाव्यावर अभ्यास होण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार आहोत, अशी घोषणा महाराष्ट्राचे मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी नवी दिल्लीतील ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केली.
येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी सांगता झाली. यावेळी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार तसेच नामवंत साहित्यिक आणि मराठी भाषिक रसिकांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप ‘पसायदान’ सादर करून झाला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन होते. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून कार्य करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
ना. डॉ. उदय सामंत.
संमेलनात रेल्वे यात्री संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्य परंपरेचे दर्शन घडले. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याची जबाबदारी साहित्यिक, कलावंत, आणि आपणा सर्वांची आहे.
यासोबतच, जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमीकाव्यावर अभ्यास होण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार आहोत. तसेच २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांच्या नावाने ‘अध्यासन केंद्र’ सुरू होणार आहे.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, सरहदचे संचालक संजय नाहर, तसेच संमेलनाचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
