‘सागरा प्राण तळमळला’ नाटकाला रत्नागिरीकरांचा भरभरुन प्रतिसाद

  • स्वातंत्र्यवीरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची: :  पालकमंत्री डॉ. उदय सामंत


रत्नागिरी :  स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी हा जिल्ह्याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची आहे, असे उद्गार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनी बुधवारी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर नाट्यगृहात दोन अंकी नाटक ‘सागरा प्राण तळमळला’ सादर झाले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर ज्या दामले कुटूंबियांच्या खोलीमध्ये राहिले त्या शैला दामले यांचा सन्मान पालकमंत्री डॉ.सामंत यांनी केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मराठी भाषा समिती सचिव तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रसन्ना दामले, कोमसापचे गजानन पाटील, माजी नगरसेवक अभिजित गोडबोले, निमेष नायर, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ.सामंत म्हणाले, तत्कालीन सरकारच्या भितीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोणी जागा देत नसताना, शिरगावमधील विष्णूपंत दामले यांनी त्यांना रहायला खोली दिली. दामले कुटूंबियांनी जागा देवून त्यांना साथ दिली, हा जिल्ह्याचा अभिमान आहे. शंभर वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीरांचा विचार रत्नागिरीत होता. त्यांच्याच विचाराने रत्नागिरी पुढे जात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला सर्वाधिक शब्द दिले आहेत. आत्मार्पण दिनानिमित्त चिपळूण आणि रत्नागिरी येथे त्यांच्या जीवनावरील सागरा प्राण तळमळला हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. स्वातंत्र्यवीरांचा हा विचार त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीला या नाटकामधून प्रेरणा देणारे ठरेल. त्यांचा विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांवर आहे, असेही ते म्हणाले.

प्रसन्ना दामले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सादर झालेल्या दोन अंकी नाटकास उपस्थितांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE