रत्नागिरी : दादर ते रत्नागिरी मार्गावर होळीसाठी जाहीर करण्यात आलेली विशेष गाडी अप-डाऊन दोन्ही मार्गांवर ४५ मिनिटे ते एक तास २० मिनिटांपर्यंत ‘बिफोर टाइम’ धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत प्रवासी संघटनांनी मागणी केल्यानुसार गाडीला अतिरिक्त थांबे देऊन उत्पन्न वाढवणे रेल्वेला सहज शक्य होते. मात्र, याकडे कोकण रेल्वे डोळेझाक केल्यामुळे ही गाडी दोन्ही मार्गावर धावताना वेळेच्या आधीच पोचल्यामुळे काही स्थानकांवर थांबवून ठेवावी लागत आहे.
होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दादर ते रत्नागिरी मार्गावर सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी रत्नागिरी ते दादरसाठी विशेष गाडीची दुसरी फेरी आज पहाटे 4.30 वाजता रवाना झाली ही विशेष गाडी पूर्णपणे अनारक्षित आहे. सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडी शिवाय खास होळीसाठी ही गाडी चालवली जात आहे.
होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल असे नियोजन करण्यात आले आहे.०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल, असे गाडीचे वेळापत्रक आहे. यानुसार रत्नागिरी ते दादर मार्गावरील होळीसाठीची आज दुसरी फेरी दादरसाठी रवाना झाली आहे.
डब्यांची रचना : एकूण डबे 16
सर्वसाधारण श्रेणी : 14 डबे
एसएलआर 2 डबे
विशेष गाडीचे थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
पहिल्याच फेरीला रत्नागिरीला पोहोचली ४५ मिनिटे आधी
दिनांक 11 मार्च रोजी पहिल्या फेरीवेळी ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी रत्नागिरी येथे नियोजित वेळेच्या ४५ मिनिटे आधी तर १३ मार्चच्या दुसऱ्या फेरीला नियोजित वेळेपेक्षा तब्बल ८० मिनिटे लवकर पोहोचली.


कोकण विकास समितीने महाडचे आमदार व राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्याकडे ०११३१/०११३२ दादर रत्नागिरी दादर होळी विशेष गाडीबाबत पुढील मागण्या केल्या होत्या :
१. या गाडीला करंजाडी, सापे वामने, विन्हेरे येथे थांबे मिळावेत
२. सदर गाडी ११ ते ३१ मार्च, २०२५ पर्यंत दैनिक स्वरूपात चालवावी
३. किमान ४ आरक्षित डबे उपलब्ध असावेत
ना. गोगावले यांनी तातडीने याची दखल घेतली. तसे पत्र महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे महामंडळ यांना दिले आहे. मात्र त्याची कार्यवाही रेल्वे कडून अद्यापही न झाल्यामुळे पहिल्या फेरीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
- हे देखील वाचा : Good News | होळीसाठी दादर-रत्नागिरी अनारक्षित विशेष ट्रेन
- Konkan Railway| उधना -मंगळुरू विशेष गाड्या जूनपर्यंत धावणार!
