उरण (विठ्ठल ममताबादे ) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण तसेच त्यांचे कार्य व विचार येणाऱ्या भावी पिढीला समजावे म्हणून शिव प्रतिष्ठान करंजाडे या सामाजिक संस्थेतर्फे शिव प्रतिष्ठान चौक सेक्टर ४, करंजाडे पनवेल येथे त्यांच्या ३०० व्या जयंती निमित्त भव्य दिव्य असे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की, एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं.
अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यामुळे त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण तसेच त्यांचे कार्य व विचार येणाऱ्या भावी पिढीला समजावे म्हणून शिव प्रतिष्ठान करंजाडे या सामाजिक संस्थेतर्फे शिव प्रतिष्ठान चौक सेक्टर ४, करंजाडे पनवेल येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त भव्य दिव्य असे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिव प्रतिष्ठानच्या वतीने करंजाडे येथे अहिल्या देवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील, कृष्णा पाटील, विक्रम मोरे, नाथाभाई भरवाड,अनिकेत चव्हाण, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, राकेश कुसळे, प्रशांत शेट्टी,अमर कुसळे, महेंद्र म्हात्रे, राजेश शेलार, संजय मोरे, अक्षय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
