रत्नागिरी : शहरातील फाटक हायस्कूल येथील इंद्रसिंग वळवी, शिल्परेखा जोशी या दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

रोटरी क्लबमार्फत दरवर्षी रत्नागिरीतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी विज्ञान विषयाच्या शिक्षिका शिल्परेखा जोशी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जोशी या अनेक वर्षे इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गांना विज्ञान विषय शिकवतात. विज्ञान विषय शिकवण्यासाठी त्या डिजिटल क्लासरूमचा वापर करतात. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहेत. त्या विज्ञान प्रमुख आहेत. विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, विज्ञान रंजन परीक्षा यांचे उत्तम नियोजन करतात. त्या परीक्षा समितीमध्ये काम पाहतात.

लायन्स क्लब रत्नागिरीमार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी इंद्रसिंग वळवी यांना जाहीर झाला आहे. वळवी हे गेली अनेक वर्षे इयत्ता आठवीच्या वर्गांना विज्ञान आणि गणित हे विषय शिकवतात. अनेक वर्षे स्कॉलरशिप आणि एन.एम.एम.एस. या परीक्षांचे मार्गदर्शन करतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा फी आणि सराव प्रश्नसंच स्वतःच्या पैशाने घेऊन देतात. शाळेतील जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतात. वळवी सर हे ग्रामीण भागातून आले असल्याने ते विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यानुसार अध्यापन करतात.
पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्षा सुमिता भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. बोपर्डीकर, शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
