- जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची एकमुखी मागणी
उरण दि १० (विठ्ठल ममताबादे) : जनसुरक्षा कायदा विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर केला व राज्यपालांच्या सही साठी गेला आहे.हा कायदा मंजूर करु नका हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसुन जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर लढणाऱ्या पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याकरिता आणला जात आहे असे परखड मत भारत जोडो अभियानच्या राष्ट्रीय समन्वयक उल्का ताई महाजन यांनी व्यक्त केले.
जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन निदर्शने केली .या कार्यक्रमात शिवसेना (उ.बा.ठा.), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) शेतकरी कामगार पक्ष, क्रांतिकारी पक्ष, उरण सामाजिक संस्थांचे पदाधिकारी , प्रमुख राजकीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी माजी आमदार मनोहर भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, कॉग्रेसचे विनोद म्हात्रे, राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर, शेकापचे रवी घरत, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान ठाकूर, सुधाकर पाटील यांनी लोकशाही विरोधी जन सुरक्षा कायदा रद्द करा या विषयावर मांडणी केली. तर सत्ताधारी भाजप युतीवर सडकून टीका केली.राज्य सरकारने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी बुधवारी उरण शहरातील गांधी पुतळा येथे महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सरकारने बहुमताच्या जोरावर विधानसभा, विधानपरिषदेत जनसुरक्षा कायदा पारीत केला आहे.सध्या हा कायदा राज्यपालांच्या सहीसाठी सादर करण्यात आला आहे.विधीमंडळातील चर्चेत कडवे, डावे हा शब्द अधोरेखित करुन जनतेच्या हितासाठी त्यांच्या बाजूने सरकारला जाब विचारणाऱ्या महाराष्ट्रातील अशा संघटनांवर कारवाई करणार ,बंदी घालणार आहे असे स्पष्ट केले आहे.
या कायद्यामुळे लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या पक्ष व जनसंघटनांवर आघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या कायद्याला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थेच्या वतीने विरोध केला जात आहे.सर्वत्र या कायद्याला विरोध होत असून उरण मध्येही जन सुरक्षा कायद्याला मोठया प्रमाणात विरोध पहायला मिळाला. निदर्शनें केल्या नंतर सर्व निदर्शक मोर्चाने गणपती चौक,जरीमरी मंदिर मार्गे उरण तहसीलदार कार्यालयावर गेले व निवेदन सादर केले.
