- भाजपा कोतवडे गटाच्या पक्ष कार्यालयाचे केले उद्घाटन
रत्नागिरी : पक्ष कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी मंदिर असते, इथे लोकांच्या अडचणी दूर केल्या जातील हा विश्वास मिळाला पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
ना. राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालय जिल्हा परिषद गट कोतवडेचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मंडल अधिकारी विवेक सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांच्यासह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, दत्ता देसाई, किसान घाणेकर, सरचिटणीस उमेश देसाई, उमेश कुलकर्णी, धामणसे ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा कुलकर्णी व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. राणे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री, रत्नागिरीचे खासदार, भाजपाचे राज्याचे प्रमुख आणि तुमचा संपर्कमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. इतके मोठे पाठबळ असताना विकास निधी हक्काने मागा. आपली कामे भाजपकडूनच होतील हा विश्वास इथल्या जनतेला द्या. हा भाजपचा पारंपरिक मतदार संघ आहे. पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी इथून निवडून गेले आहेत. ते वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करा, कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालय मंदिरासारखे असते, त्याना आधार वाटला पाहिजे असे काम करा, कोतवडे या भाजपाच्या या पारंपारिक बालेकिल्ल्याचे वैभव असेच राहावे यासाठी तुमच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन ना. राणे यांनी यावेळी केले. यावेळी ना. राणे यांनी येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
