परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष, प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई, १२ सप्टेंबर २०२५: भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, एसटी महामंडळाने एक अभिनव उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. लवकरच, महाराष्ट्रातील ७५ प्रमुख बसस्थानकांवर ‘मोफत वाचनालय’ सुरू होणार आहे. या उपक्रमाची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष, प्रताप सरनाईक यांनी दिली.
नेमका उपक्रम काय आहे?
हा उपक्रम विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. या मोफत वाचनालयांचा मुख्य उद्देश प्रवाशांना आणि स्थानिकांसाठी दर्जेदार वाचनाची सोय उपलब्ध करून देणे हा आहे. यामध्ये विविध लोकप्रिय मराठी साहित्यिक, कवी आणि कादंबरीकारांच्या पुस्तकांचा समावेश असणार आहे.
कोणत्या लेखकांची पुस्तके उपलब्ध असतील?
वाचनालयांमध्ये वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), पु.ल. देशपांडे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, शंकर पाटील, व.पु. काळे, विश्वास पाटील अशा अनेक दिग्गजांची पुस्तके, कविता संग्रह आणि कादंबऱ्या उपलब्ध असतील. ही सर्व पुस्तके नागरिकांना घरी घेऊन जाऊन वाचण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडे नोंदणी करण्याची सोय आहे.
स्पर्धा परीक्षांसाठीही विशेष सुविधा
या मोफत वाचनालयांमध्ये फक्त साहित्यच नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, दररोजची स्थानिक वर्तमानपत्रे देखील वाचण्यासाठी उपलब्ध असतील.
मराठी साहित्याचा ‘वाचन कट्टा’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाला ‘वाचन कट्टा’ असे संबोधले आहे. ते म्हणाले की, हा उपक्रम मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे आणि यानिमित्ताने जनतेला एक अनमोल भेट दिली जात आहे.
