रत्नागिरी : पुण्यातील ग्रामोन्नती-नेट या संस्थेतर्फे रत्नागिरीत शुक्रवारी, दि. २१ नोव्हेंबर रोजी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा असा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उमेदअंतर्गत येणाऱ्या महिला उद्योजकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रामोन्नतीचे संचालक अमित अस्नीकर यांनी दिली.
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला होणाऱ्या उत्सव उद्योजकता या कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या RAMP (Raising and Accelerating MSME Performance) योजनेतील प्रशिक्षण सत्र, रहेजा कंपनीमार्फत सोलर ड्रायरविषयी मार्गदर्शन, गौरांग आगाशे यांच्याशी संवाद साधून नव्याने उपलब्ध असलेल्या संधी, व्यावसायिक शिक्षणातील संधी, उद्योग करताना उपयोगी पडतील असे गुण लक्षात आणून देणारे खेळ अशी सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदही रानडे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या आरएएमपीचे संचालक अनिरुद्ध ब्रह्मे, रत्नागिरीतील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, संचालक श्रीमती माधवी शिंदे,, रहेजा सोलार फूड प्रोसेसिंगचे परमित, रत्नागिरीच्या अनबॉक्स प्रा. लि. चे गौरांग आगाशे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उमेद अभियानाचे रत्नागिरी जिल्हा आणि सर्व तालुक्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील.
रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत होणार असलेल्या या उत्सवाला दीडशेहून अधिक महिला राहणार असून निवडक १० यशस्वी उद्योजिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.













