मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दरड कोसळली
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प
डोंगर फोडण्यासाठी केलेल्या सुरुंग स्फोटांमुळे दरड रस्त्यावर कोसळली
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात बुधवार सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास डोंगर फोडण्यासाठी करण्यात आलेल्या स्फोटामुळे कोसळलेले दगड व माती महामार्गावर आल्याने वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. ही दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पावसाळ्यात या घाटात दरड कोसळून एका बाजूची वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे सध्या या घाटातील रस्त्या लगत असलेले डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे.
बुधवार दि. 2 रोजी सकाळपासून या ठिकाणी सुरुंग स्फोट घडवून रस्त्यालगत डोंगरावरील खडक फोडण्याचे काम सुरू होते. याच कामादरम्यान सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास नियंत्रित स्फोट घडवल्यानंतर कोसळलेल्या दरडीने महामार्ग व्यापून टाकला. दरडीचा काही भाग रस्त्याच्या बाजूचा कठडा तोडून गेला. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. परंतु, नियंत्रित स्फोटाचा मलबा मर्यादित क्षेत्रात हे काम करणार्यांना अपयश आल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू व्हायला सुमारे एक तासाचा कालावधी लागला.
या मार्गावर अधीच एकाच बाजून वाहतूक सुरू आहे. दरम्यान, हा प्रक्रार घडला तेव्हा नेमका एक टँकर देखील रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने वाहतुकीला आणखी अडथळा झाला व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.