चिपळूण : शहरात ‘नाम’ फाऊंडेशनकडून शिवनदीतील गाळ काम सुरु असतानाच एक पोकलेन नदीपात्रात कलंडून गाळात रुतली.
आतापर्यंत नाम फाउंडेशनतर्फे ५० टक्के गाळ काढण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. यंत्रणेतील कर्मचारीही दिवसरात्र राबत असून आपला जीव धोक्यात घालून पावसाळ्यापूर्वी ते काम मार्गी लावण्यासाठी झटत आहेत. सद्यस्थितीत नाम फाऊंडेशनतर्फे वाशिष्ठी व शिवनदीत गाळ उपसा करण्याचे काम एकाच वेळी सुरु आहे. त्यासाठी चार पोकलेन, पाच डंपर व जेसीबी अशी यंत्रणा कार्यरत आहे.
येथील महर्षी कर्वे भाजी मंडईच्या मागील बाजूस खाटीक आळी परिसरातील शिवनदीत रविवार दुपारी गाळ काढण्याचे काम सुरू होते. अशातच एक पोकलेन नदी काठावरून थेट पात्रात कोसळला. त्याठिकाणी पाणीही खूप होते. त्यामध्ये अर्धा पोकलेन बुडाला. सुदैवाने चालक तितक्याच तत्परतेने केबीनमधून बाहेर पडला. त्यानंतर अन्य दोन पोकलेनच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली पोकलेन बाहेर काढण्यात आली.
