राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भू-राजापूर मुख्य मार्गावर वृक्षारोपण
वड – पिंपळ अशा प्राचीन रोपांची लागवड
देवरुख : वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचे जतन करण्याचा केवळ आग्रह धरुन चालत नाही तर यासाठी प्रत्यक्ष वृक्ष लागवडीसारखे काम हाती घ्यावे लागते . आपण काही कार्य केले तरच आपण उपदेश करु शकतो या उक्तीप्रमाणे आज राजापूर येथील भू – राजापूर मुख्य मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भू मंडळातर्फे वड आणि पिंपळ या प्राचीन आणि सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या उपक्रमाने नक्कीच पर्यावरण जतनाचे काम प्रत्यक्षात संपन्न होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भू मंडळाच्या वतीने आज सकाळी भू ते राजापूर या मुख्य मार्गावर वड , पिंपळ अशा पुरातन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सुमारे २० झाडांची लागवड करण्यात आली . सकाळी ११ वाजता भू येथे डॉक्टर भाट्ये यांचे निवासस्थानी एकत्र जमून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सर्व झाडांची यशस्वीपणे लागवड करुन तसेच या झाडांचे जतन व्हावे यासाठी झाडांभोवती सुरक्षित कुंपण करण्यात आली आहेत .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भू मंडलातील सदस्य गेली दहा वर्षे वृक्ष लागवडीचा हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. अशा उपक्रमातून लावलेल्या ३६ रोपांचे आता मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे . आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी भू मंडळाचे १५ स्वयंसेवक आणि ५ बालस्वयंसेवक उपस्थित होते.