नाचणे येथील ओम साई योग कक्षाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी
रत्नागिरी : शहरातील नाचणे साळवी स्टॉप येथील ओम साई मित्र मंडळ संचलित ओम साई योग कक्षेच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सव विविधांगी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शहरातील नाचणे साळवी स्टॉप येथील ओम साई मित्र मंडळाच्या सभागृहात ओम साई योग कक्षेच्यावतीने ही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या योग कक्षेच्यावतीने प्राणायाम आणि योगासन वर्ग उपक्रम मोफत घेण्यात येतो. गेली पंधरा वर्ष हा उपक्रम अविरतपणे सातत्याने सुरू आहे. पतंजली समिती योगगुरु प.पू.रामदेव बाबा व आचार्य बालकृष्ण महाराज यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या गुरुपौर्णिमेनिमित्त यज्ञ अग्निहोत्र यावेळी केंद्रात करण्यात आला. या योगकक्षेचे केंद्रप्रमुख श्री. अनंत आगाशे यांच्या हस्ते हा अग्निहोत्र विधी विधीवत पार पडला.
यानंतर आध्यात्मिक तत्त्वांनी संस्कारित यज्ञ याग आणि आहुती सर्व योग साधकांच्यावतीने अग्निहोत्रात वाहण्यात आली. यानंतर योग कक्षेचे केंद्रप्रमुख श्री. अनंत आगाशे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अग्निहोत्राचे आयोजन करण्यामागचा हेतू सांगून जीवनातील गुरुमहात्म्य विशद केले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, या योग कक्षेच्या माध्यमातून सुदृढ, सुजाण, सुसंस्कारित भारतीय नागरिक घडविण्याचा दृष्टिकोन आणि ध्येय साधले जात आहे. आजच्या धावपळीच्या जगात उत्तम शरीरस्वास्थ्य राखणे ही काळाची गरज बनली आहे. वाढत्या आजारांचा विचार करता सुदृढ आरोग्य संपन्नता टिकवून ठेवणे यासाठी प्राणायाम आणि योगासने यांची नितांत गरज आहे. सुसंस्कारीत सुजाण भारतीय पिढी घडविण्याचे काम या ओम साई योगकक्षा प्राणायाम योग संस्कारांच्या माध्यमातून मोफतपणे केले जाते. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला असून या प्राणायाम योगावर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन ओमसाई योगकक्षेचे प्रमुख केंद्र संयोजक अनंत आगाशे यांनी शेवटी केले.
ओम साई योग कक्षेच्या या गुरुपौर्णिमा उत्सवात योग कक्षेचे योगसाधक समीर भाटवडेकर, संजय सुर्वे, पांडुरंग जाधव, सोपान दशवंतराव, प्रकाश मुणगेकर, जगदीश कदम, मीरा केळकर, वैशाली दळी, प्रज्ञा जाधव, नम्रता दशवंतराव, समिधा सुर्वे, पल्लवी शेट्ये, नीता यादव, श्रद्धा करकरे, जान्हवी शिंगाई यांच्यासह सर्व साधकांनी सहभाग घेतला.