https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 87

मुंबई, दि.1 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, या समाजघटकासाठी विनातारण कर्ज योजना राबवणार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शासन स्वतः केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

चेंबूर येथील फाईन आर्टस् कल्चरल सेंटरमध्ये आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार राहुल शेवाळे,आमदार प्रकाश फातर्पेकर,सुधाकर भालेराव, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई गोपले, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(बार्टी)चे महासंचालक धम्मज्योती गजभिये,सहसचिव दिनेश डिंगळे ,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे संचालक अनिल आहिरे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे खूप मोलाचे योगदान होते. सर्वसामान्य माणसाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य व पोवाडा यातून तत्कालीन परिस्थितीचे यथार्थ प्रतिबिंब दिसते. त्यांनी अविरतपणे वंचितांसाठी काम केलेच. परंतु मराठी भाषेची पताका साता समुद्रा पलीकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या राहत्या घराचे भव्य स्मारक व्हावे यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करेल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अधिकाधिक सक्षम करून या समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. उच्च शिक्षणासाठी प्राधान्याने योजना राबविण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.