उरणमध्ये दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी
कोरोना निर्बंध हटल्याने मोठा उत्साह
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : राज्यात सर्वत्र दहीहंडीची जोरदार तयारी सुरु आहे. गोविंदा पथकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा शुक्रवार दि 19/8/2022 रोजी गोपाळकाला आहे. कोरोनाचा निर्बंध हटविल्याने तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने सर्व गोविंदा पथकांना, बाळ गोपाळाना तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही गोपाळकाला अर्थातच दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करता येणार आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र जोरदार पूर्व तयारी चालू असून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे.
उरण तालुक्यात होणेश्वर गोविंदा पथक -बोरी,उरणावती देवी गोविंदा पथक -देऊळवाडी, येशीदेव गोविंदा पथक- सातरहाटी, हनुमान कोळीवाडा गोविंदा पथक -हनुमान कोळीवाडा, ॐ साई गोविंदा पथक – मोरा,जरी मरी गोविंदा पथक नागाव, शिव स्वराज्य गोविंदा पथक कोप्रोली आदी असे अनेक गोविंदा पथके दहीहंडी साठी सज्ज झाली आहेत. दररोज गोविंदा पथकाची सरावे चालू आहेत. भगवान श्रीकृष्णा पासून ही परंपरा, हा सण आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मातील एक पवित्र व प्रसिद्ध सण म्हणून याकडे पाहिले जाते. दही हंडी या क्रीडा प्रकारातून युवकांच्या कौशल्यांची परीक्षा होते. त्यांचा कस लागतो. युवकांची कौशल्ये पणाला लागतात. मात्र या स्पर्धेतून युवकांना, बाळ गोपाळाना एक वेगळा आनंद मिळत असतो.युवकांसाठी, लहान मुलांसाठी हा एक मोठा सणच असतो. झाडांना किंवा इमारतीना किंवा खाबांना दोर बांधून दोरीच्या मधोमध उंच मडका बांधले जाते. मडक्यात दूध, दही, सुट्टे पैसे, प्रसाद ठेवले जाते. मनोरे रचून, एकावर एक उभे राहून मानवी गोल साखळी बनवून हा मटका फोडला जातो. या सणाचा आनंद लहान बालकापासून ते आबाल वृद्धा पर्यंत सर्वच जण लुटत असतात.
दहीहंडीच्या सरावाच्या बाबतीत शिवस्वराज्य गोविंदा पथक कोप्रोलीचे अध्यक्ष अमेय पितळे यांना विचारले असता “श्रावण महीना आला की आपल्या हिंदू परंपरेनुसार आपले लोकप्रिय सण येतात आणि सर्व हे सण अगदी उत्साहाने साजरा करतात त्यातील युवकांचा आवडता सण म्हणजे गोपाळ काला.दोन वर्ष कोरोना च्या संकटामुळे दही हंडी उत्सव साजरा करणं शक्य झालं नाही. पण यंदा हा सण पूर्णपणे जल्लोषात साजरी केला जाणार आहे. अस चित्र दिसतंय तर हा सण फक्त गावमर्यादीत सण राहिला नसून तर आता सुनियोजित पद्धतीने सरावाच्या माध्यमातून एकावर एक मानवी मनोरे रचणारे गोविंदा पथक देखील तयार झाले आहेत. त्यातील एक पथक म्हणजे शिव स्वराज्य गोविंदा पथक कोप्रोली उरण.या पथकाने 2019 मध्ये 9 ठिकाणी 6 थरांची सलामी दिली आणि यंदा देखील सरावावर जोर देऊन सरावाला 6 थर लावून दाखवले . सर्व कोप्रोली ग्रामस्थांच्या पाठींब्या मुळे दही हंडी च्या दिवशी 7 थर लावण्याचा प्रयत्न असेल” असे शिवस्वराज्य गोविंदा पथक कोप्रोलीचे संस्थापक अध्यक्ष अमेय पितळे यांनी सांगितले.