अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन, संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात तिरंगामय आरास
रत्नागिरी : १५ ऑगस्ट : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तसेच संकष्टी चतुर्थी यांचा योग जुळून आल्याने सोमवारी रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिरात तिरंगामय आणि नयनमनोहर अशी आरास करण्यात आली. मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरास करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात राष्ट्रध्वज तिरंग्याचा उत्सव विविध पद्धतीने साजरा केला जात आहे. कुठे धरणे, इमारती तसेच धबधब्यांवर तिरंगा प्रतिबिंबित होणारे नयनरम्य लेझर शो तर कुठे इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.
महाराष्ट्रातील तमाम भाविकांचं मोठे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात सोमवारी संकष्टी चतुर्थी तसेच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन यांचा मिलाफ लक्षात घेऊन बाप्पासमोर फुलांची तिरंगामय आकर्षक आरास करण्यात आली होती. बाप्पाचं दर्शन घेतलेल्या शेकडो भाविकांनी गणपतीपुळे येथील मंदिरातील ही आरास सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली होती.
अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील गणपतीपुळे येथील बापाचे दर्शन तत्काळ घडू लागले आहे. यासाठी मंदिरातील विश्वस्त मंडळींसह पुजारी मंडळींचे चांगले सहकार्य लाभत आहे. गणपतीपुळे मंदिरात रोजची पूजा झाल्यानंतर बाप्पाचं दर्शन दूर राहून सुद्धा घडत असल्याने सोशल मीडियावर बाप्पाचे देश-विदेशातील भक्त सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
सोशल मीडियाच्या जमान्यात गणपतीपुळे येथील बाप्पाचे आभासी दर्शन घडवण्यासाठी मंदिरातील मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांचे सहकार्य लाभत आहे.