कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्स्प्रेसच्या विस्टा डोम कोचचे आरक्षण उद्यापासून
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यापर्यंत धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला दिनांक 15 सप्टेंबरपासून विस्टा डोम कोच जोडण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या या आलिशान गाडीच्या विस्टा डोम कोचसाठी दि. दिनांक 14 सप्टेंबरपासून आरक्षण सुरू होणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यातील करमाळी पर्यंत जाणारी तेजस एक्सप्रेस येत्या एक नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत धावणार आहे. त्या आधी दिनांक 15 सप्टेंबरपासून या गाडीला पारदर्शक काचानी युक्त आणि पर्यटकांच्या पसंतीचा विस्टा डोम कोच जोडण्यात येणार आहे. या कोचसाठीचे आरक्षण रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्या तसेच ऑनलाईन दिनांक 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 22 तसेच 30 ऑक्टोबर रोजी सीएसएमटी ते मडगाव पर्यंत धावणारी तेजस एक्सप्रेस वेटिंग लिस्ट वर आहे. त्यामुळे या दिवशी या गाडीला विस्टा डॉन कोच जोडण्यात येणार नाही. त्याऐवजी या तारखांना एसी चेअर कारचा डबा जोडण्यात येणार आहे.