कोकणचा साज संगमेश्वरी बाज कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध युवा उद्योजक आणि समाजसेवक सौरभ मलुष्टे यांच्या वाढ दिनानिमित्त शनिवार १ ऑक्टोबर रोजी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटात होणारी ही स्पर्धा साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत होणार असल्याचे सौरभ मलुष्टे मित्रमंडळ यांच्यातर्फे कळवण्यात आले आहे.
सौरभ मलुष्टे मित्रमंडळ यांच्याकडून याबाबत प्रसिध्दी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. उद्योजक सौरभ मलुष्टे यांचा वाढदिवस 1 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिनानिमित्त सौरभ मलुष्टे मित्रमंडळ यांच्याकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ ली ते ३ री व ४ थी ते ६ वी अशा दोन गटांमध्ये होणार आहे.
या स्पर्धेसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा ए-३ साईज पेपरवर घेण्यात येईल. चित्र रंगवण्यासाठी कोणतेही माध्यम वापरता येऊ शकेल. चित्र काढण्यासाठी विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात येईल. ए ३ साईज पेपर सोडून कलर व इतर सर्व साहित्य स्पर्धकांनी आणावयाचे आहे.पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे.
स्पर्धेचा निकाल हा परिक्षकांचा अंतिम निर्णय असेल. स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याला सायकल तर दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 1500 आणि तृतीय क्रमांकासाठी 1001 रोख रक्कम देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पाच बक्षीसे देऊन गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुलांनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी स्पर्धा प्रमुख गौतम बाष्टे 9403503883 आणि स्वप्निल दळी 9822822884 यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेनंतर संगमेश्वरी बोली चा कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच बक्षीस समारंभ उद्योग मंत्री ना. उदय सामंत तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.