संगीता अरबुने यांच्या कविता संग्रहाचे अ. भा. म. सा. संमेलनात संमेलनाअध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन

वसई : सुप्रसिद्ध कवयित्री संगीता अरबुने यांच्या ‘बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर ’ या ग्रंथाली प्रकाशित कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच उदगीर येथे भरलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथाली च्या स्टॉल वर संपन्न झाले. अरबुने यांच्या काव्यप्रवासाला शुभेच्छा देतानाच त्यांनी या प्रकाशनाच्या निमित्ताने स्त्रियांच्या संदर्भातील एक महत्वाचा कवितासंग्रह वाचकांना उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा म्हणाल्या की, आज स्वतःबरोबरच समाजाच्याही उत्कर्षात एका बाईला एक बाईची साथ महत्त्वाची वाटते ही अतिशय महत्वाची गोष्ट संगीता अरबुने यांची कविता निदर्शनास आणून देते. याबरोबरच स्त्रिया आज इतक्या मोकळेपणाने कवितेतून व्यक्त होत आहेत. या बद्दल त्यांनी अरबुने यांचे आणि या संग्रहातील त्यांच्या कवितांचेही कौतुक केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी अरबुने यांची कविता दिवसेंदिवस प्रगल्भ आणि धीट होते आहे, असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अनुराधा नेरुरकर यांनी ’बायका झुळझळत ठेवतात आयुष्याचा पदर’ च्या निमित्ताने ग्रंथालीने एक चांगला संग्रह वाचकांना उपलब्ध करून दिला असल्याचे सांगतानाच ग्रंथाली ही संस्था केवळ एक व्यावसायिक प्रकाशन संस्था नसून साहित्य संवर्धनासाठी उभी राहिलेली एक व्यापक चळवळ आहे. या शब्दात ग्रंथालीचे कौतुक देखील केले.
या कवितासंग्रहातील कवितांचे वाचन अनुराधा नेरुरकर आणि मंदाकिनी पाटील यांनी केले तसेच अतिशय रंगतदार झालेल्या या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कविता मोरवणकर यांनी केलं.
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी राजीव जोशी, प्रभाकर साळेगावकर, ज्योती कपिले, सुधीर चित्ते, हबीब भंडारे, अनिता येलमट, लता गुठे, फरजाना डांगे आदी मान्यवर उपस्थित होते

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE