महाआरतीनंतर मनसेचे वैभव खेडेकरांना फोनवरून धमकी

इंटरनेटचा वापर करून अज्ञाताचा धमकीचा फोन


खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना फोन करून अज्ञात व्यक्तीने धमकावण्याचा प्रकार घडला आहे. दि. 4 रोजी रात्री 10.30 वाजता त्यांना हा इंटरनेटचा वापर करून धमकीचा फोन करण्यात आला. खेडमध्ये महाआरती करण्यात आल्यानंतर हा प्रकार घडल्याचे श्री. खेडेकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेडमध्ये दि. 4 रोजी सायंकाळी 7 वाजता शहरातील सोनारआळी येथे श्री सिद्धीविनायक मंदिरासमोर महाआरती व हनुमान चालिसा पठण करण्यात आले. यावेळी मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर उपस्थित होते.
महाआरती नंतर श्री खेडेकर यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने इंटरनेटच्या सहाय्याने कॉल केला. श्री. खेडेकर यांना समोरून बोलणार्‍या इसमाने महाआरती व मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या विधानावरून नाराजी व्यक्त केली. ‘मी तुझ्या घरी येतो, मग पळून जाऊ नको’ असे म्हणत अज्ञाताने धमकवले, अशी तक्रार श्री. खेडेकर यांनी खेड पोलिस ठाण्यात केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE