रत्नागिरी : फुणगूस येथील जिल्हा परिषद मराठी शाळा शेजारील क्रीडा मैदानात पार झालेल्या फुणगूस प्रीमियर लीग २०२३ बॉक्स क्रिकेट पर्व एकचा विजयी मानकरी विपुल कम्युनिकेशन तर उपविजेतेपदाचे मानकरी कुमजाई फुणगूस संघ ठरला आहे.
आय.पी.एल च्या धर्तीवर गावागावात प्रीमियर लीगचे फिव्हर पोहचले असून तरुण खेळाडूंसह जेष्ठ खेळाडूही एकाच छताखाली येत क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहेत. गावागावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. खाडीभागात प्रथमच जि.प.मराठी शाळा शेजारील क्रीडा मैदानात फुणगूस येथे फुणगूस प्रीमियर लीग (पी.पी.एल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात आठ संघांनी सहभाग घेतला होता. बॉक्स क्रिकेट स्पर्धेत लीगच्या धर्तीवर खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दोन दिवस डे-नाईट चाललेल्या स्पर्धेला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
अंतिम सामना विपुल कम्युनिकेशन व कुमजाई फुणगूस यांच्यात अतिशय अटीतटीचा रंगला. कुमजाई फुणगूस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेल्या विपुल कम्युनिकेशन संघाच्या सलामीच्याच जोडीने चौकारांचा बेभाट मारा करत चार षटकात ८७ धावांचा डोंगर उभा करून कुमजाई फुणगूस संघा समोर विजयासाठी ८८ धावांचे आवाहन उभे केले. मात्र कुमजाई फुणगूस संघाचा एक गडी बाद करून विजयी पल्ला गाठू न देता ७१ धावांवरतीच मर्यादित ठेऊन विपुल कम्युनिकेशन संघाने विजयाची बाजी मारत फुणगूस प्रीमियर लीग २०२३ पर्व एकचा प्रथम विजयी चषक पटकावण्याचा मान मिळवला. व प्रतिस्पर्धी कुमजाई फुणगूस संघास उपविजेते पदावर समाधान मानण्यास भाग पाडले.
मान्यवरांच्या हस्ते संघ मालक विपुल मांडवकर यांच्या प्रथम विजेता संघ विपुल कम्युनिकेशन संघास चार फुटी चषक व १०,०२३ रुपये रोख पारितोषिक तर सुधीर देसाई संघ मालक यांच्या कुमजाई फुणगूस उपविजेता संघास तीन फुटी चषक व रोख ७०२३ पारितोषिक, तृतीय मानकरी रश्मीकांत उर्फ बिपीन देसाई संघ मालक यांच्या उमा चे माहेर संघास चषक व ३०२३ रुपये पारितोषिक तर चतुर्थ क्रमांकाचे चषक व २०२३ रुपये पारितोषिक प्रकाश(कंटप्पा दाडी) लोगडे संघमालक यांच्या के.पी.एल संघास देऊन गौरविण्यात आले.


