नाणीज येथे गुरुवारी श्रीराम नवमी वारी उत्सव

विविध कार्यक्रमांचे आयोजन

नाणीज, दि. २७ : येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा ‘श्रीराम नवमी’ वारी उत्सव येत्या गुरुवारी ३० मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाची सुरुवात २९ मार्चला विविध धार्मिक कार्यक्रमाने व यागाने होईल. त्यानंतर सुंदरगड व नाथांचे माहेर येथील देवदेवतांना श्रीराम नवमी सोहळ्याची निमंत्रणे देण्यात येणार आहेत. वाद्यांच्या गजरात, मिरवणुकांनी हा कार्यक्रम होईल.
सुंदरगडावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या सुंदर मूर्ती असलेले श्रीराम मंदिर आहे. या सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिरासह सुंदर गडावरील सर्वच मंदिरे सुशोभित सुशोभित करण्यात आली आहेत.
गुरुवारी ३० मार्च रोजी मुख्य सोहळा आहे. ११.३० ते १ या काळात जन्मोत्सव होईल. यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार आहेत. यावेळी श्रीरामाची गाणी, पाळणा म्हटला जाईल. पुष्पवृष्टी केली जाईल. प्रसाद, महाप्रसाद असेल. श्रीरामाचा जयजयकार करीत सारे आनंदोत्सव साजरा करतील.


त्यापूर्वी चरण दर्शन, धर्मक्षेत्र मासिकाची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा सत्कार होईल. रात्री ७.३० ते ८.३० प.पू. कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर सर्वांचे आकर्षण असलेले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर देवाला साकडे घालून वारी उत्सवाची सांगता होईल.
दरम्यान या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. २९, ३० मार्च असे दोन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटलमध्ये नामवंत डॉक्टर तपासणी व उपचार करणार आहेत. दोन दिवस २४ तास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE